शेतकऱ्यांची मागणी : जिल्हा उपनिबंधकांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी ११ सप्टेंबर २०२० मध्ये मूग शेतीमाल तारण योजनेत ठेवला होता. यातील ७० टक्के रक्कम दिली, पण उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिली नाही. कायद्याच्या कलम ४५ नुसार किल्लेधारूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. धारूर बाजार समितीत मूग शेतीमाल तारण योजनेत शेतकऱ्यांनी जवळजवळ एक वर्षापूर्वी ठेवला आहे. दि. १२ व १३ सप्टेंबर २०२० ला वजनासह पावत्या घेतल्या. ७० टक्के रक्कम देण्यात आली आहे. मूग तारण ठेवून जवळपास ११ महिने १७ दिवस होत आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव किमती प्रमाणे अद्यापही ३० टक्के रक्कम मिळालेली नाही. हे शेतकरी तालुक्यातील चिखली व देवठाणा येथील आहेत. त्यांनी १८० दिवसांच्या आत रीतसर मूग विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावेत, अशी मागणी बाजार समितीकडे केली होती ; परंतु याबाबत कसलीच कार्यवाही झाली नाही. तरी बाजार समितीवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ज्ञानोबा शिंदे, भगवान काशीद, भागवत शेंडगे, मंगलबाई काशीद, पंडित काशीद, मुरलीधर काशीद, विजय काशीद, मधुकर शेंडगे, केशव काशीद यांच्यासह २१ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.