लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथील तरूण शेतकरी रेणुकादास कृष्णा पाठक यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अडीच एकरमध्ये कमी कालावधीत दहा लाखांचे उत्पन्न घेत या भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श शेती कशी करावी, याचे उदाहरण ठेवले आहे.
रुईधारूर हा परिसर जमिनी व्यवस्थित नसल्याने व पाण्याची सोय नसल्याने याठिकाणी खरिपाचे एकच पीक घेऊन शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती. शेतकऱ्यांवर उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन शोधण्याची वेळ येत होती. खोडस येथील साठवण तलाव व या भागातील विविध गावात झालेल्या संबंधित कामांमुळे जमिनीतील पाणीपातळी वाढली आहे. विंधन विहिरी, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा नवीन पीक व नगदी पीक घेण्याकडे कल वाढत आहे. रुईधारूर येथील शेतकरी रेणुकादास कृष्णा पाठक यांनी त्यांच्या पंधरा एकर शेतीपैकी अडीच एकर शेतीमध्ये ढोबळी मिरचीची लागवड करून उत्कृष्ट पीक घेतले आहे. यामध्ये अडीच महिन्यात ५०० ते ६०० क्विंटल उत्पन्न येईल, अशी अपेक्षा आहे. यामधून दोन महिन्यात दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून, आंबेजोगाई, माजलगाव, परभणी, लातूर येथील बाजारपेठेत त्यांची ढोबळी मिरची विक्रीसाठी जात आहे. या तरूण शेतकऱ्याला परमेश्वर भोसले यांनी मार्गदर्शन केले. पाठक यांनी केलेल्या या नवीन प्रयोगाचे या परिसरात कौतुक होत असून, अन्य शेतकऱ्यांसाठी हा नवीन प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.