एक शाळा बंद, तर दोन शाळांमध्ये मुख्याध्यापक गैरहजर, बजावल्या नोटीसा
धारूर : धारूरचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी आपल्या पथकासह तालुक्यातील पाच जिल्हा परिषद शाळांना बुधवारी भेटी दिल्या. यामध्ये एक शाळा बंद तर दोन शाळेत मुख्याध्यापक गैरहजर आढळले तर एका शाळेत शिक्षक गैरहजर आढळले. गावंदरा येथील शाळेतील उत्कृष्ट नियोजन पाहून त्यांनी शाळेच्या कारभाराचे कौतुक केले.
सध्या कोरोना कालावधीमुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. धारूर तालुक्यात बुधवारी धारूरचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील सय्यद हकीम यांच्या पथकाने तालुक्यातील आरणवाडी, धारूर ग्रामीण मधील वडरवाडा, चोरंबा, सोनिमोहा व गावंदरा या पाच शाळांना अचानक भेटी दिल्या. यावेळी अरुणवाडी येथील शाळेला तर कुलूप होते. वडारवाडा शाळेमध्ये अनेक शिक्षक गैरहजर असल्याचे आढळले. चोरंबा शाळेत शाळा सुरू झाल्यापासून १६ जूनपासून येथील मुख्याध्यापक गैरहजर असून त्यांनी कोणालाही येथील आपला पदभार दिल्याचे दिसून आले नाही.
सोनिमोहा या शाळेतील मुख्याध्यापक २६ जूनपासून शाळेत गैरहजर असल्याचे दिसून आले व त्यांची कुठलीही रजा वगैरे नव्हती व कोणास निगराणीही दिलेली नव्हती. येथील दोन शिक्षकही रजेवर होते. त्यांची रजा मंजूर करण्यात आलेली नव्हती. तर गावंदरा येथील शाळेत भेट दिली असता येथील व्यवस्था व येथील सर्व व्यवस्थापन पाहून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व ही शाळा आदर्श शाळेकडे वाटचाल करत असल्याचे पाहून येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कौतुक केले . इतर ज्या शाळेत भेटी देताना कमतरता आढळल्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस देऊन याचा खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा योग्य न वाटल्यास त्यावर कडक कारवाई करणार असल्याचेही गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी सांगितले