आष्टी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील कडा येथे अनिल ढोबळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवार व रविवारी दोन दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत दोन दिवस उत्स्फूर्त पाळत आहेत. आष्टी तालुक्यामध्येही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, कडा शहर येथील तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असून, परिसरात नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजारात गर्दी करतात. रविवारी जनावरांचा बाजार व भाजीपाला बाजार असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. या वाढणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी दवंडी देऊन शनिवारी व रविवारी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांना शनिवारी संपूर्ण दिवसभर बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. तसेच रविवारी सकाळपासून शहरात शुकशुकाट दिसत आहे. कडेकरांनी दोन दिवसांच्या पाळलेल्या जनता कर्फ्यू ने जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
===Photopath===
210321\img-20210321-wa0338_14.jpg