वडवणी : शहरातील मुख्य भागातील, तसेच गल्लीबोळांतील काही भागांत रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालणे अवघड होऊन बसले आहे, तसेच भुरट्या चोऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अवैध धंदे बोकाळले
जातेगाव : गेवराई तालुक्यात जातेगाव हे सर्कलचे गाव आहे. येथे आठवडी बाजार गुरुवारी भरतो. या दिवशी टपरी व किराणा दुकानांवर सर्रास गुटखा विक्री सुरू असते, तसेच अवैध धंदे, अवैध देशी-विदेशी दारू, अवैध वाहतूक, मटका आदी धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नियंत्रणाची मागणी
गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तलाठी शोधण्याची वेळ
पाटोदा : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळ खात असून, महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सजावर तलाठ्यांना थांबण्याची सक्ती करण्याची मागणी होत आहेत.
दुरवस्था कायम
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार जडू लागले आहेत.
वडवणीकर वैतागले
वडवणी : बसस्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. परिसरातील व्यापारी आणि नागरिक येथे कचरा आणून टाकत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास येथील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. येथे स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.