बीड : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्युदर कमी हाेत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याचा मृत्युदराचा टक्का १.९४ एवढा असून बीड जिल्ह्याचा २.६५ एवढा असल्याचे समाेर आले आहे. राज्यापेक्षा बीडचा टक्का जास्त असल्याने चिंतेत भर पडली आहे. याच आकडेवारीवरून राज्याचे मंत्रिमंडळ शुक्रवारी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बीडमध्ये आले होते.
जिल्ह्यात १ मे ७ मे दरम्यान कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३३ टक्के होता. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात खाट मिळविण्यासाठी रुग्णांना परिश्रम घ्यावे लागत होते. ऑक्सिजनसह औषधींचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; परंतु सद्य:स्थितीतील आकडेवारी पाहिली तर पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्केपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर जुन्या, नव्या मृत्यूचा आकडा वाढतच आहे. रोज १० पेक्षा जास्त मृत्यू नोंदविले जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याचा मृत्युदर १.९४ एवढा आहे, तर बीड जिल्ह्याचा टक्का तब्बल २.६५ एवढा आहे.
दरम्यान, राज्याच्या तुलनेत बीडमधील रुग्णसंख्या आणि मृत्युदराचे आकडे पाहून शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करण्यासह उपचाराचा दर्जा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. आता यात आरोग्य विभाग किती उपाययोजना करते आणि मृत्युदर रोखण्यात त्यांना कधी यश येते, हे येणारी वेळच ठरविणार आहे.
---
रिकव्हरी रेट समाधानकारक
मृत्युदर चिंताजनक असला तरी राज्यासह जिल्ह्याचा रिकव्हरी रेट समाधानकारक आहे. राज्याचा टक्का ९५.७० असून जिल्ह्याचा ९५.८० एवढा आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बीड अव्वल असून राज्याचा प्रति रुग्ण रेषो १६.३ एवढा आहे, तर बीडचा १७.३ एवढा आहे. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे शुक्रवारी कौतुकही केले होते.
--
जिल्ह्यात दुसरी लाट उशिराने आली. त्यामुळे मृत्युदर अधिक आहे. असे असले तरी उपचारातील दर्जा वाढविण्यासह मृत्युदर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात लवकरच यश येईल. नागरिकांनीही त्रास होत असेल तर तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे. अंगावर दुखणे काढू नये.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
---
मृत्यू रोखण्यासाठी मिशन झिरो डेथ राबविले जात आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित रुग्ण शोधून त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे, तसेच कोमॉर्बिड आजार असलेल्यांना काळजी घेण्याबाबत आवाहन व मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्याचा मृत्युदर राज्यापेक्षा जास्त आहे हे मान्य असून तो लवकरच कमी होईल, यासाठी प्रयत्न करू.
-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
--