विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती
अंबाजोगाई : शासनाने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होत असले तरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्यास अजूनही धजावत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत साशंक आहेत. शाळेत शिक्षक आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची अत्यल्प संख्या आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थींच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करून देखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.
व्यावसायिकांकडून
नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पेठ भागात अवैध गतिरोधकांमुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते, तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होत असली तरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.