मल्लिकार्जुन प्रसन्ना : कर्तव्य पार पाडताना नैतिकता जोपासावी
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी परळी शहरातील संभाजी नगर व शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासणी केली. यानिमित्त परळी पोलीस ठाण्याच्या इमारतीला रंगरंगोटी करून स्वच्छता करण्यात आली होती. सुशोभित रांगोळीही काढण्यात आली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी तपासणी दरम्यान सर्व अद्ययावत रेकॉर्ड पाहून समाधान व्यक्त केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडताना नैतिकता जोपासली पाहिजे तसेच वेळेवर कर्तव्य बजावले पाहिजे. पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने हाताळून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कायम कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यासह दोन्ही पोलीस ठाण्यांचे आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.