वडवणी : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शांतता व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण समाजाने सोमवारी रस्त्यावर उतरत ताम्हण-पळी वाजवीत ‘जागो सरकार जागो’चा नारा दिला. ब्राह्मण संघर्ष समितीच्या या अनोख्या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून गेला होता.
ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन-प्रशासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी शांततेच्या व लोकशाही मार्गाने तहसील, जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलने केली. मुंबईत महाधरणे करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून समाजाच्या भावना कळविल्या; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे स्मरण पत्र देऊन हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली; परंतु सरकारने यावर कसलाच निर्णय घेतला नाही. या आंदोलनात समितीचे धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, दिगंबर जोशी, योगेश जोशी, धनंजय कुलकर्णी, शामराव जोशी, अमोल कुलकर्णी, बाळासाहेब जोशी, श्रीकांत जोशी, प्रशांत जोशी, प्रदीप जोशी, कालिदास रत्नपारखी, सतीश देशमुख, मुरलीधर कोहाळे, मोहन जोशी, शुशांत जोशी, दत्तात्रय जोशी, प्रकाश जोशी, पांडुरंग जोशी, संजय रत्नपारखे, दत्तात्रय रत्नपारखे, अशोकराव रत्नपारखे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
२२ जानेवारीनंतर आंदोलन तीव्र
१ ते २२ जानेवारीपर्यंत राज्यभरात तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी वाजवून ‘जागो सरकार जागो’ असा नारा देत ब्राह्मण समाज संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने आंदोलन सुरू आहे. ११ जानेवारी रोजी वडवणी तहसील कार्यालयात ताम्हण-पळी वाजवून जागो सरकार जागोचा नारा देण्यात आला. २२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे. २२ जानेवारीपर्यंत सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विचार न केल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे संघर्ष समितीने वडवणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.