बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील आणि मराठा मोर्चाचे संयोजक आ. विनायक मेटे. व्यासपीठावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, ॲड. मंगेश पोकळे आदी पदाधिकारी.
बीड : मुंबई येथून पहिल्यांदा स्व. आण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये पहिला मराठा आरक्षणाचा मोर्चा काढला होता. तेव्हापासून आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी आपल्या सर्वांचा लढा सुरूच होता. राज्य शासनाने दखल न घेतल्यास मराठा मोर्चाचे लोण संपूर्ण राज्यात पसरेल, असा इशारा नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाजाच्या भवितव्यासाठी समाजाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी नरेंद्र पाटील आणि मोर्चाचे संयोजक आमदार विनायक मेटे यांनी केले.
स्व. आण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये पाहिलेले व त्यासाठी दिलेले बलिदान, आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी ५ जून रोजी आयोजित मराठा क्रांती संघर्ष मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
पाटील म्हणाले की, १९८२ पासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. तेव्हापासून आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी खूप संघर्ष केला. ५८ मूक मोर्चे आणि मुंबईत एक महामोर्चाही निघाला. त्यानंतर मोर्चे, आंदोलने झाली. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले परंतु दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावनीत आपण हा लढा हारलो. यासाठी आघाडी सरकारचा निष्क्रिय कारभार पूर्णपणे कारणीभूत होता. आताही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा हा लढा उभा करावा लागत आहे. त्यासाठी आमदार विनायक मेटे यांनी बीडमधून याचे रणशिंग फुंकले असून, ५ जून रोजी मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी या आरक्षण लढ्यात आपली उपस्थिती लावावी. आता नाही, तर पुन्हा कधीच नाही... असा हा मोर्चा असेल. या मोर्चाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. परिणामी राज्य सरकारवर मोठा दबाव तयार होणार असून, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या गाईडलाईननुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमध्ये संपूर्ण सवलत व इतर काही सोयी-सुविधा मिळविण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. समाज बांधवांनी या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
सर्व नियमांचे पालन करून बीड येथील मोर्चा कुठल्याही परिस्थितीत निघणार आहे. आतापर्यंतचे मोर्चे मूक स्वरूपाचे होते. मात्र या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या समस्यांवर आवाज उठविला जाणार आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे या मोर्चाच्या संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवतील. त्यावर विश्वास न ठेवता मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी यावेळी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेस मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी .बी. जाधव, ॲड. मंगेश पोकळे आदी उपस्थित होते.
===Photopath===
030621\03bed_9_03062021_14.jpg
===Caption===
पत्रकार परिषद