वडवणी : शॉर्टसर्किटने आग लागून तालुक्यातील खळवट लिमगाव शिवारातील दहा एकर ऊस जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या विद्युत वाहिन्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. शार्टसर्किटच्या वाढत्या घटना घडल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवडी लिमगाव शिवारातून वीज वितरणचे खांब काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता खळवट लिमगाव परिसरात शॉर्टसर्किट होऊन पाच एकर ऊस जळाल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येईपर्यंत शेतकरी प्रकाश आंबुरे यांचा ३ एकर व बळीराम बापमारे यांचा २ एकर क्षेत्रातील ऊस शाॅर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.