बीड : कोरोना ड्यूटी करून आलेल्या भूलतज्ज्ञाला आठ दिवस कोठे होतास, अशी अरेरावी करीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी आपल्या कक्षात बोलावून घेत शिवीगाळ केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात घडला. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे. या प्रकराने खळबळ उडाली असून ड्यूटीतील दुजाभाव आणि मुद्दा पुन्हा यानिमित्ताने उफाळून आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ यांच्या रोटेशननुसार कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी लावल्या जातात. २२ ते २६ दरम्यान भूलतज्ज्ञ डॉ.शाफे यांचीही कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी होती. परत येऊन ते सामान्य रुग्णालयात रूजू झाले. मंगळवारी त्यांची ऑन कॉल ड्यूटी होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांना डॉ.राठोड यांनी संपर्क करून काेठे आहेस रे, असे म्हणत अरेरावी केली. यावर डॉ.शाफे त्यांना कक्षात जावून भेटले असता त्यांना पुन्हा अरेरावी करून शिवीगाळ केली. तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचे डॉ.शाफे यांनी तक्रारीत म्हटले आहे. असे वारंवार होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून डॉ.राठोड विरोधात रोष व्यक्त होत आहे. याबाबत डॉ.राठोड यांना रात्री सात वाजेच्या सुमारास चार वेळा संपर्क केला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही. आता याची चौकशी कोण करणार आणि त्यात काय निष्पन्न होणार हे वेळच ठरविणार आहे. दरम्यान, यापूर्वीही ड्यूटीवरून वरिष्ठ विरूद्ध कनिष्ठ असा वाद झाला होता. काही डॉक्टरांनाच वारंवार ड्यूटी लावली जाते. दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा तेच घडताना दिसत असून वाद होत आहेत.
कोट
कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी करून मंगळवारी ऑन कॉल होतो. दुपारी १२ वाजता डॉ.राठोड यांचा फोन आला. त्यांना भेटलो असता मला अरेरावी करण्यासह अपमानास्पद वागूणक देत शिवीगाळ केली. असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली आहे.
डॉ.सय्यद अब्दुल शाफे, भूलतज्ज्ञ जिल्हा रुग्णालय बीड
कोट
डॉ.राठोड यांच्याविरोधात तक्रार आली आहे. त्याची आवक जावकला नोंद झाली असून याबाबत चौकशी केली जाईल.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड