शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा करावा, पालिकेचा कारभार भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करावा, कोरोना काळातील सहा महिन्यांची घरपट्टी, नळपट्टी माफ करावी, घरकूल योजनेतील सर्व अर्ज निकाली काढून ते मंजूर करावेत, दररोज सफाई करून कचरा उचलावा, बंद सिग्नल व पथदिवे सुरू करावेत, महापुरूषांच्या पुतळ्यांची देखभाल करावी आदी मागण्यांना घेऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात केली. डोक्यावर रिकामा हंडा घेऊन आंदोलनकर्ते महिला, नागरिक सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा रोड मार्गे नगरपालिकेवर धडकले. यावेळी महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत संताप व्यक्त केला.
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा व माजलगाव धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तरीदेखील नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे बीड शहरातील जनतेला जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम करण्यात येत आहे. काही भागात आठ ते दहा दिवसाला तर काही भागात पंधरा दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासह असंख्य समस्येने बीड शहरातील जनता त्रस्त झाली आहे. पाण्याचे महत्त्व जाणून केंद्र शासनाने अटल अमृत योजना बीड शहरासाठी मंजूर केली मात्र या अटल अमृत योजनेचे बीड नगरपालिकेने बोजवारा वाजवला आहे. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, नाल्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत, ही प्रमुख मागणी होती. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बीड नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध घोषणा देत व हंडा वाजवत त्यांनी बीड शहर दुमदुमून सोडले. यावेळी मोर्चामध्ये महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीराताई डावकर, माजी सभापती वैशाली मेटे, अनिता घुमरे, प्रियंका पाटील, माजी नगरसेविका शीतल गायकवाड, साधना दातखीळ, छाया डोरले, माजी सभापती मनिषा कोकाटे, स्वाती शिंदे, रेखा तांबे, शेख फातिमा कौसर, शेख अंजुम, यांच्यासह शिवसंग्रामचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.