अंबाजोगाई : जात - धर्म , गरीब -श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता बेवारस रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे शेख मुख्तार यांना गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. पृथ्वीराज साठे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया , मनोज लखेरा, बब्रुवान पोटभरे ,खमरोद्दीन फारूखी , हकीमलाला पठाण , एम. ए. हकीम, महादेव आदमाने,संजय गंभीरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी हे होते.
यावेळी समाजसेवक शेख मुख्तार यांना मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह , सन्मानपत्र, शाल , पुष्पहार असे होते. याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी शेख मुख्तार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक हकीमलाला पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आतिक हाश्मी व फराह फारूकी यांनी केले. तर शेख आबेद यांनी आभार मानले. मुख्य कार्यक्रमानंतर अनेक नागरिक व विविध संस्थांच्या वतीने शेख मुख्तार यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी शेख व सहकाऱ्यांना सामाजिक कार्यात पुढे जाण्याचे बळही दिले .
१५ वर्षांपासून अविरत सेवा
मागील पंधरा वर्षांपासून शेख मुख्तार हे अविरत समाजसेवा करीत आहेत. येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. ज्या रुग्णांना कोणताही नातेवाईक नाही, त्यांना शेख मुख्तार जेवणाचा डबा , औषधे , फळे पुरविण्याचे नि: स्वार्थ काम करतात. अनेक बेवारस रुग्णांचे उपचारादरम्यान निधन झाल्यास सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर अंत्यविधी करण्याची जबाबदारी शेख मुख्तार व त्यांचे सहकारी घेतात. मृत रुग्ण ज्या धर्माचा असेल त्याप्रमाणे अंत्यविधी करण्यात येतो. अनेक कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठीही शेख मुख्तार यांनी पुढाकार घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते हकीमलाला पठाण यांनी गरिबांच्या भोजनासाठी रोटी बँकेचा प्रकल्प राबविला. त्यामुळे हजारो नागरिकांना मोफत जेवण मिळाले.