धारूर : मुलींना अभ्यासासाठी तसेच खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, मुली व महिलांनी या ठिकाणी येऊन अभ्यास करावा, खेळावे. त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, त्याचे त्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे तसेच स्वत:मधील क्षमता ओळखून आत्मनिर्भर व्हावे, या उद्देशाने मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने तालुक्यातील असोला येथे आत्मभान केंद्र सुरू करण्यात आले आहे.
धारूर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. लॉकडाऊनच्या काळात शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे मुलींना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. मुलगी मोठी झाली. त्यातच शाळा ,कॉलेज बंद आहे मग घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा लग्न लावण्याची मानसिकता पालकांची बनली. लॉकडाऊनच्या काळात कमी खर्चात लग्न उरकावे, या हेतूने धारूर तालुक्यात बालविवाह झाल्याचे सांगण्यात येते. बालविवाहाला आळा बसावा या हेतूने गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समिती स्थापन केल्या आहेत. त्यानंतर मनस्विनी महिला प्रकल्पाने आता एक पाऊल पुढे टाकत आत्मभान सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. मुलींना अभ्यासासाठी तसेच खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, मुली व महिलांनी या ठिकाणी येऊन अभ्यास करावा, खेळावे. त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, त्याचे त्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्वत:ची क्षमता ओळखून आत्मनिर्भर व्हावे, या उद्देशाने मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने असोला येथे आत्मभान केंद्र सुरू केले आहे.
यावेळी मनस्विनी महिला प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. अरुंधती पाटील, असोल्याच्या सरपंच रंजना चोले, जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक थोरात, माध्यमिकचे मुख्याध्यापक घुगे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल निपटे यांनी केले. तर सावित्रा इरमले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोल्याचे प्रेरक रवी चोले, प्रेरिका मनीषा मोरे, मनस्विनी महिला प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते व जि. प. शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.