बीड : जिल्ह्यातील नदीपात्रातून बेसुमार अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांकडून वाळूसाठा केला जात आहे. असा वाळूसाठा बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदफणा नदीपात्रातून जप्त केला आहे. जप्त केलेली वाळू चोरीस जाण्याच्या भीतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणून टाकण्यात आली आहे.
तालुक्यातील कुक्कडगाव, चव्हाणवाडी, खुंड्रस या शिवारातील सिंदफणा नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. गंगाची वाळू असल्याचे सांगून व दोन्ही भेसळ करून चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूमाफिया दिवसाढवळ्या जेसीबीने वाळूचा उपसा करीत आहेत. गुरुवारी याच ठिकाणी वाळू उपसा करत असताना जेसीबीचालक व ट्रॅक्टरचालक यांच्यात हाणामारी झाली होती. याची माहिती महसूल व पोलीस यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी रात्री नदीपात्रात बीडचे तहसीलदार सुशांत शिंदे यांनी छापा मारला. यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूसाठा केल्याचे दिसून आले. ती सर्व वाळू ताब्यात घेतली असून, चोरी जाण्याची शक्यता असल्याने यापैकी जवळपास १५ ते २० ब्रास वाळू जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून टाकली आहे. दरम्यान, नदीपात्रालगतच्या काही शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रस्ता उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या वाळू चोरी प्रकरणी त्यांची देखील चौकशी केली जाणार असून, कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली. ही कारवाई तहसीलदार सुशांत शिंदे व मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी अजय मोराळे यांनी केली.