माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील नियोजन ढेपाळले, तसेच कर्मचारी व परिचारिकांची मनमानी सुरू असल्याने सकाळी ९.३० वाजता डोसला सुरुवात करण्याऐवजी १०.४५ वाजता सुरुवात करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत रुग्णालय प्रशासन ताळ्यावर आले आणि शुक्रवारी डोस वेळेवर देण्यास सुरुवात झाली.
माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मंगळवार व शुक्रवारी लहान मुलांना विविध प्रकारचे डोस देण्यात येतात. त्यामुळे सकाळपासूनच याठिकाणी माता आपल्या लेकरांना घेऊन बसलेल्या असतात. मंगळवारी याठिकाणी सकाळी ९ वाजेपासून लहान मुलांना घेऊन माता हजर होत्या. ९.३० वाजता डोस देण्यास सुरुवात होणे आवश्यक असताना १०.३० वाजेपर्यंत कोणीच डोस देणारे हजर नव्हते. १०.३० वाजता याठिकाणी परिचारिका हजर झाल्या.
दरम्यान, याठिकाणी कोरोना काळ असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. ११ वाजता बाळाला पहिला डोस देण्यात आला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी ‘बाळाच्या डोससाठी मातांवर ताटकळण्याची वेळ’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित करताच शुक्रवारी दिला जाणारे डोस वेळेच्या अर्धातास अगोदर देणे सुरू करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे थंडीच्या दिवसांत व कोरोना काळात ताटकळत बसण्यापासून सुटका झाल्याने मातांमध्ये समाधान व्यक्त होत होते.