बीड : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या वाचनालयामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. मात्र, वर्तमानपत्र, पुस्तके वाचायला नागरिक अद्याप येत नाहीत. मात्र, हळूहळू चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा येथील ग्रंथपालांकडून व्यक्त होत आहे.
घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने संताप
बीड : शहरातील अनेक भागात आजही नगर पालिकेच्या घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. काही वेळेस परिसरात कचरा साचून राहात असल्याने दुर्गंधी सुटत आहे. स्वच्छता विभागाने याचे योग्य नियोजन करून घंटागाड्या वेळेत पाठविण्यासह कचरा उचलून न्यावा, अशी मागणी होत आहे.
चिंचाळा - माटेगाव रस्ता उखडला
वडवणी : तालुक्यातील चिंचाळा ते परडी माटेगाव हा रस्ता सध्या उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच या रस्त्यावरून शेतकऱ्यांची वर्दळ असते. त्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे बाजारपेठेला फटका
पाटोदा : शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या बाजारपेठेला याचा मोठा फटका बसत आहे. महावितरणने लक्ष देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.