- नितीन कांबळेकडा : आष्टी तालुक्यात काही तलाठी हे १४ वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच काही कर्मचारी याच तालुक्यातील रहिवासी आहेत. यामुळे काम करताना तक्रारी वाढत आहेत. वारंवार त्यांची सज्जा बदलण्याकरिता नागरिक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे ६ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या तलाठ्यांची तालुक्याबाहेर बदली करावी, असे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावरून ११ तलाठ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे ठाण मांडलेल्या तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तलाठ्यांसह काही कर्मचारी हे दीर्घकाळ एकाच तालुक्यात कार्यरत आहेत, तसेच ते स्थानिक आहेत. यामुळे त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूणच कामावर परिणाम होत आहे. या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देण्यात आलेली आहे. तरीही त्यांच्या कामामध्ये कोणतीच सुधारणा होत नाही, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये स्थानिक कर्मचारी काम करत असल्याने तक्रारी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. नवीन भरतीमध्ये आलेला तलाठी वर्ग हा त्यांचेच अनुकरण करत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या तलाठ्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करावी, असे पत्र आष्टीच्या तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पाठविले आहे.
यापूर्वी बदल्या का नाहीत?वैशाली पाटील यांच्या पत्राने महसूलमधील बदल्यांचा सावळागोंधळ लक्षात आला आहे. स्वग्राण आणि नियमानुसार ६ वर्षांत बदली होणे अपेक्षित असतानाही यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदली का केली नाही? असा प्रश्न आहे. यावरून तलाठ्यांनी राजकीय वशिला लावून आपल्या बदल्या थांबविल्याचा संशय आहे. त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे अभय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तलाठी - कार्यकाळएस.एम. केमधरणे - १४ वर्षे ८ महिनेएस.एम. दगडखैर - १० वर्षे ११ महिनेनंदा शिंदे - ९ वर्षे ७ महिनेजी.के.गावडे - ९ वर्षे ७ महिने,छाया मेश्राम - ८ वर्षे ५ महिनेजगदीश राऊत - ७ वर्षे ४ महिनेआय. एच. शेंदूरकर - ७ वर्षे ६ महिनेप्रवीण बोरुडे - ६ वर्षे १० महिनेडी.यू. अनारसे - ९ वर्षेबी.एस. कवळे - ९ वर्षे ६ महिने,बाळू बनगे - १२ वर्षे