बीड : बस प्रवासात एका प्रवाशी महिलेचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास परळी बसस्थानक ते अंबाजोगाई या दरम्यान घडली.
सय्यद इम्रान मुज्जामिल (रा. मलिकपुरा, परळी) हे त्यांची बहीण शेख हिना कौसर शेख अहेमद यांच्यासह परळी ते लातूर या बसने सोमवारी प्रवास करत होते. या दरम्यान परळीतील आझादनगर येथून तीन अनोळखी महिला अंबाजोगाईला जाण्यासाठी बसमध्ये शेजारी बसल्या होत्या. या दरम्यान त्यांनी सय्यद यांच्या बॅगेतील सोन्याचे दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. लातूर येथे गेल्यानंतर सय्यद व त्यांच्या बहिणीस हा प्रकार लक्षात आला. शेजारी बसलेल्या तीन अनोळखी महिलांनीच हे दागिने चोरल्याचा संशय सय्यद यांनी तक्रारीत व्यक्त केला. या प्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.