रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी
बीड : तालुक्यातील सात्रापोत्रा येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे बैलगाडीने शेतात जाणे देखील कठीण बनले आहे. शेतीमाल घरी आणण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिसरातील पाणंद रस्त्याची कामे करावी, अशी मागणी आहे.
बीड शहरातील नाल्यांची सफाई नाही
बीड : शहरातील पांगरी रोड, जिजामाता चौक, मोंढा रोड, सुभाष रोड, माळी वेस, दत्तनगर, धोंडीपुरा, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खाद्यतेल वाढल्याने सामान्य ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : सध्या खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत तसेच किराणा सामानात इतरही विविध साहित्यांचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.