लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कल्याण - विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील पाडळशिंगी - पाथर्डी रस्त्यावर असलेल्या तांदळा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या शेतजमिनीवर असलेले सरकारी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी उपोषण केले.
तांदळा परिसरातील ७८ गटांमधील ११४ कुटुंबांच्या जवळपास १४० एकर जमिनीवर शासनाने अतिक्रमण केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नकाशावरील शीवरस्ता वेगळाच असून, महामार्गाच्या नावाखाली तो शेतजमिनीतून वळविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नकाशाच बदलल्याने ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत निवेदन दिले होते. मात्र, अद्याप प्रशासकीय पातळीवर कुठलीही कार्यवाही न झाल्याने गुरुवारी ११४ कुटुंबातील सदस्य दिलीप सुलाखे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले होते. विशेष म्हणजे शासन यंत्रणेकडे रस्त्याबाबतचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने या ग्रामस्थांच्या मावेजाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, आमच्या जमिनीवरुन सरकारी अतिक्रमण हटवावे ही मागणी असल्याचे दिलीप सुलाखे यांनी यावेळी सांगितले.