बीड : परळी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी जुगार अ़ड्डा चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश अधीक्षक आर. राजा यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने परळीत विविध ठिकाणी छापे टाकले. यावेळी रेल्वेस्थानक रोडवरील एक मीनार चौकासमोर तितली भोवरा या ऑनलाइन जुगारावर छापा टाकून झुंबरलाल गणेशलाल चरखा (रा. गणेशपार) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख १२ हजार ९९० रुपये व संगणक, प्रिंटर व इतर साहित्य असा एकूण २४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईत शिवाजी रामभाऊ तटाले (रा.नेहरू चौक) याला मटका खेळविताना पकडले. त्याच्याकडून रोख ५ हजार २५० रुपये जप्त करण्यात आले. शेख मतीन शेख समदानी (रा. मल्लीकपुरा) यालादेखील मटका खेळविताना ताब्यात घेतले. त्याच्याकून ७५० रुपये जप्त केले. याप्रकरणी शहर व संभाजीनगर ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आनंद कांगुणे व सहकाऱ्यांनी या कारवाया केल्या.