पुरूषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तुरीची खरेदी करण्यात येत असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर तुरीची खरेदी झाली. आतापर्यंत १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त तूर खरेदी झाली असल्याची माहिती सभापती भारत शेजुळ यांनी दिली. यावर्षी शासकीय भावापेक्षा कमी दराने विक्रीला शेतकऱ्यांनी पसंती दिली.
माजलगाव तालुक्यात कापूस व ऊसानंतर तुरीचा पेरा असतो. यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चांगला पाऊस झाला. या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु, तुरीचे पीक चांगले आले. त्यामुळे यावेळी तुरीची माजलगावच्या मोंढयात चांगली आवक असून, मंगळवारपर्यंत मोंढयात ५,७०० ते ५,८०० रुपये क्विंटल दराने २५ हजार ६६८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. याद्वारे शेतकऱ्यांना १४ कोटी ३२ लाख ६२ हजार ७० रुपये मिळाले.
गेल्यावर्षी बाजार समिती अंतर्गत केवळ ६ हजार ६५४ क्विंटल तुरीची खरेदी केवळ ४,२०० ते ५,१४५ रूपये दराने करण्यात आली होती. त्यावेळी शासकीय भाव हा ५ हजार ८०० रूपये होता. तूर विक्रीतून शेतकऱ्यांना ३ कोटी ३६ लाख ४१ हजार ७७५ मिळाल्याची माहिती सभापती भारत शेजुळ व सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली.
शासकीय खरेदी सुरू होणार
यावर्षी अद्याप शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करत शासकीय भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी केली. यावर्षी शासकीय तूर खरेदीचा भाव ६ हजार रुपये आहे. गतवर्षी ३ हजार १५० क्विंटल तुरीची शासकीय खरेदी करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना १ कोटी ८२ लाख ७० हजार रुपये मिळाल्याची माहिती शासकीय खरेदीदार अमित नाटकर यांनी दिली. तर येत्या २-३ दिवसात तुरीची शासकीय खरेदी सुरू करणार असल्याची माहितीही नाटकर यांनी दिली.