बीड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी रस्त्यांवर उतरत मास्क न वापरणाऱ्या दुचाकीचालकावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. शिवाजीनगर वाहतूक शाखा, बीड शहर, पेठ बीड पोलिसांनी जवळपास १८० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मास्क वापरूनच प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
धांडेनगर रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील कै. शिवाजी धांडेनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. हा रस्ता पक्का नसल्याने नागरिकांना वाहने चालविण्यास अडचणीचे ठरत आहे. याबाबत उपोषणाचा इशारा देण्यात आलेला होता. मात्र याची दखल नगरपालिकेने अद्यापही घेतलेली नाही. नगरपालिकेने नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
महसूल, पोलीस विभागाची संयुक्त मोहीम
गेवराई : शहरात मास्क न वापरणऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलीस प्रशासन व नगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. ४० ते ५० जणांवर कारवाई करीत सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगल कार्यालयाला नोटिसा बजावण्यात आल्या असून, पन्नासपेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
वेचणी केलेल्या कापसाची चोरी
बीड : शेतामध्ये ठेवलेला चार ते पाच क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील कामखेडा येथे घडली.
शेख सिराज यांनी वेचलेला कापूस शेतातील गोठ्यात गोण्यांत भरून ठेवला होता. अज्ञात चोरट्याने संधी साधून चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला व इतर कापूस अस्ताव्यस्तपणे शेतामध्ये टाकला.