बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदानानंतर रविवारी निकाल जाहीर झाला. या निकालानुसार विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते इतर उमेदवारांच्या तुलनेत जास्त होती. नऊ उमेदवारांना भोपळा, तर २४ उमेदवारांना किमान दहा मतेही घेता आली नाही. पुढारीपणाची हौस की राजकारणासाठी राजकारण हेही यातून उमगले नाही, मात्र हौस चांगलीच जिरल्याचे पहायला मिळाले. इतर शेती मतदारसंघातून अमोल आंधळे यांना २२३ मते मिळाली. या मतदारसंघात माजीमंत्री बदामराव पंडित यांना केवळ दोन मते मिळाली, तर चर्चेत राहिलेले धनराज मुंडे हे केवळ ९, तर फुलचंद मुंडे १ मत मिळवू शकले. मागील संचालक महादेव तोंडे यांना भोपळा मिळाला. महिला मतदारसंघातून सुशीला पवार यांना २३४, तर कल्पना शेळके यांना १९४ मते मिळाली. प्रयागबाई साबळे या स्पर्धेत मागे राहिल्या. कृषी पणन मतदार संघातून जगदीश काळे यांनाही भोपळा तर संगीता बडे यांना केवळ १ मत मिळाले. भाऊसाहेब नाटकर यांनी ४२ मते घेत बाजी मारली. नागरी सहकारी बँक, पतसंस्था मतदारसंघातून राजकिशोर मोदी यांनी ९३ मते घेत विजय मिळविला. गंगाधर आगे यांना ३६ संगीता लोढा यांना १, तर सत्यसेन मिसाळ, रंगनाथ धोंडे, चंद्रकांत सानप, विलास सोनवणे यांना भोपळा मिळाला. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रवींद्र दळवी यांना ७२०, तर दिलीप भोसले यांना २८, तर अन्य तीन उमेदवारांना दहा मतेदेखील मिळविता आली नाही. इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून विजयी कल्याण आखाडे यांना ७१६ मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून सूर्यभान मुंडे ७१० मते घेत विजयी झाले. या मतदारसंघात महेंद्र गर्जे यांना केवळ चार, महादेव तोंडे, वैजिनाथ मिसाळ यांना प्रत्येकी सहा, तर सत्यसेन मिसाळ, सुग्रीव मुंडे यांना प्रत्येकी एक तर चंद्रकांत सानप यांना ५ आणि वसंतराव सानप यांना ४ मते मिळाली.
------
गुलाल लागला पण पुढे काय?
१९ पैकी ८ जागांसाठी निवडणूक झाली. दोन दिवस राजकारणही रंगले. निकाल जाहीर होऊन गुलाल लागला पण बँकेचे संचालक मंडळ कोरमपूर्ती करू शकणार नाही, त्यामुळे निवडून आलेले उमेदवार औटघटकेचे संचालक ठरणार की त्यांना केतील सत्तेची संधी मिळणार हे पहावे लागणार आहे. अल्पमतातले संचालक मंडळ आल्याने सहकार कायद्यानुसार होणारी कार्यवाही आणि रिझर्व्ह बँकेचे काय निर्देश येतात याकडे लक्ष लागले आहे.
------