बीड : जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ व व्हाइट फंगस या आजारावर उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांची व कर्मचारी वर्गाची नितांत आवश्यकता असून त्याची पूर्तता त्वरित करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपकरणाची आणि कर्मचारी वर्गाची नितांत गरज आहे. कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रसामग्री रुग्णालयात आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयासाठी बायपॅप व्हेंटिलेटर मशीन - ५०, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन ५०, म्युकरमायकोसिसबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने शस्त्रक्रियागृहात आवश्यक यंत्रसामग्री आहे. कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने बाधित बालकांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रसामग्रीत पेडियाट्रिक व्हेंटिलेटर - ३, पेडियाट्रिक सक्शन मशीन - ३, पीडियाट्रिक बेड - ३०, सिझोफेर्निया या मनोविकारावरील औषधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. रुग्णालयामध्ये एकही कान, नाक, घसा सर्जन नाही. एक कान, नाक, घसा सर्जनची नियुक्ती अत्यावश्यक असून तत्पर निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.