- संजय खाकरेपरळी (बीड) : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र डॉ. अक्षय संभाजी मुंडे यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले. 24 एप्रिल गुरुवारी रात्री त्यांचे पांगरी येथे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीद्वारे त्यांचे उत्साहात स्वागत केले.
डॉ. मुंडे दिल्लीहून रात्री आठ वाजता पांगरीत पोहोचले. गावात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आई इंदुबाई मुंडे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीचे आयोजन केले. गोपीनाथ गड ते पांगरी कॅम्पपर्यंत उघड्या जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीत मिरवणूक काढण्यात आली. श्री हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर त्यांच्या आई इंदुबाई मुंडे उपस्थित होत्या. ॲड. श्रीनिवास मुंडे, ज्ञानोबा मुंडे पाटील, विनायक मुंडे, श्रीकांत तिडके, दत्तात्रय तिडके, महादेव मुंडे, सुमंत पांचांगे, माणिक मुंडे, किशन मुंडे, वसंतराव तिडके, गोविंद मुंडे, नंदकिशोर मुंडे, अभिमान मुंडे, डॉ. संतोष मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर असेन"गावकऱ्यांनी माझे जसे स्वागत केले, तसंच त्यांना गरज भासेल तेव्हा मीही त्यांच्या मदतीला तत्पर असेन," असे भावनिक उद्गार डॉ. अक्षय मुंडे यांनी काढले. त्यांनी सांगितले की, सहा प्रयत्नांनंतर स्वतःच्या मेहनतीवर हे यश संपादन केले. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास केला. आर्थिक अडचणींमुळे काही क्लासेसमध्ये बसता आलं नाही. तरीही प्रयत्न सुरू ठेवले. "यशानंतर एका कोचिंग क्लासेसनी माझा फोटो लावला, पण मी त्यांना विनंती केली की फोटो काढा, कारण चुकीचा संदेश जाऊ नये. आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवूनही यश मिळवता येते," असेही त्यांनी नमूद केले.
आईने शेतीत कष्ट करून मुलांना शिकवलेडॉ. अक्षय यांनी डेंटिस्ट म्हणून काही काळ सेवा केली आणि शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षण पूर्ण केले. आईने शेतीत कष्ट करून त्यांना शिकवले. त्यांच्या यशात बहिणी अक्षता हिचेही मोठे योगदान आहे. "अक्षयने फोन करून 'आई, मी यूपीएससीत पास झालो' असे सांगितले, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले," असे इंदुबाई मुंडे भावूकपणे म्हणाल्या. "पांगरी गावाचा डॉ. अक्षयमुळे अभिमान वाढला आहे," असे मत ॲड. श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केले.