अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते लोखंडी सावरगाव टी-पॉईंट ५४८ ब राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्या अगोदरच सेलू अंबा येथील टोल वसुली रजाकारी पद्धतीने वसुली होऊ लागल्याचा प्रत्यय खुद्द आ. नमिता मुंदडांनाच आला. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकासह कार्यकारी अभियंत्यासह एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांच्या अंबाजोगाईतील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत त्यांनी खडे बोल सुनावले. त्या बैठकीदरम्यान रस्त्याच्या कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.
रेणापूर ते लोखंडी सावरगाव टी-पॉईंट हा ५४८ ब राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावरील अंबा सहकारी साखर कारखाना चौकातील १.२ किलोमीटर उड्डाणपूल मावेजामुळे रखडलेला आहे. या उड्डाणपुलात जागा गेलेल्या शेतकऱ्यांसह स्थानिकांना अकृषी व नगररचनाकार यांच्या मान्यता असलेल्या शेतकऱ्यांनाच भरीव मदत मिळणार होती. परंतु, आवॉर्डप्रमाणे मावेजा देण्यात यावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आल्यानंतर या उड्डाणपुलात गेलेल्या सर्वच लाभधारकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच मावेजा मिळणार आहे. मावेजा मिळेपर्यंत स्थानिकांनी या उड्डाणपुलाचे काम थांबविले असले तरी तात्पुरत्या स्वरूपात पुलालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी कबूल केले. अंबा कारखाना ते मोरेवाडी चौकातील हॉटेल लोकसेवाजवळ दोन्ही दुर्तफा साईटनी रस्त्याची जंपींग वाढली आहे. त्यामुळे दररोज अपघात होऊ लागले आहेत. ही जंपींग काढून त्याची लेव्हल करून देण्याचे मान्य केले. गेल्या आठवड्यातच जोगाईवाडी जंक्शनवर एका पादचाऱ्याचा अपघात झाला होता. ज्या भागात राष्ट्रीय महामार्गाचा टोलनाका सुरू होतो. त्या टोलनाक्याच्या परीघातील २० किलोमीटर अंतरातील असणाऱ्या वाहनधारकांना मासिक पास देऊन टोल मुक्त करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा नियम आहे.
अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस केजच्या आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, प्रकल्प संचालक एस.व्ही.पाटील, शाखा अभियंता आर .ए. गायकवाड, टीमलिडर एस.के.नवटाके, कंत्राटदार सुरेंद्रकुमार शुल्का, रेणापूर ते लोखंडी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, कानसिंन जी. आर, अॅड. संतोष लोमटे आदी उपस्थित होते.
मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - आ.मुंदडा
अंबा कारखाना चौकातील उड्डाणपुलामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मावेजा मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मावेजासाठी प्रयत्न करणार आहे.
- नमिता अक्षय मुंदडा,आमदार केज विधानसभा