आष्टी : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच आ. बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथे आल्यानंतर पहिल्याच दिवशी विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत विकास कामाचे आराखडे तयार करून मंजूर झालेली कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
१२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत आ. आजबे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. यापुढील कामाबाबत तत्काळ विकास आराखडे तयार करावेत व मंजूर करून आणलेले कामे तत्काळ सुरू करावेत अशा सूचना दिल्या. प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील विकास आराखडे तयार करावेत. आवश्यक तेथे कामे दर्शवून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी. ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या सोडविण्याची हमी दिली. या बैठकीला सामाजिक वनीकरण ,वन विभाग, आरोग्य विभाग ,सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, पाणीपुरवठा ,जिल्हा परिषद बांधकाम विभाग अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या
मतदारसंघातील वीज प्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. यावर्षी काही भागांमध्ये अजूनही चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळी पिकेही घेतली जात आहेत. त्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली. मतदारसंघात जवळपास १०५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर असून ही कामे संबंधित ग्रामस्थांना विश्वासात घेऊन दर्जेदार करावीत , असे आ. बाळासाहेब आजबे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.