गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहेत, तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत आहे.
विनामास्क न फिरण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तरीही नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर हायवेवर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत.
कपाशी पीक धोक्यात
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात अतिवृष्टी आणि अवकाळीच्या तावडीतून बाहेर पडताच या भागात कपाशीला बोंडअळीने पोखरले आहे. एक ते दीड क्विंटल उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
सुविधांचा अभाव
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
नियमांची ऐशीतैशी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
रस्ता दुरुस्ती करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत अद्यापही लक्ष दिले जात नाही. यामुळे नागरिक, वाहनधारकांची कसरत होत आहे.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवेची मागणी होत आहे.