बीड : विनापरवाना अवैधरित्या वाळू वाहतूक करताना एक टिप्पर ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत केली. टिप्पर चालक राजाभाऊ सुभाष मुंडे याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वाळू घेऊन जाणारा टिप्पर (क्र. एम.एच. १६, ए.ई. ५५२३) पिंपळनेर रोडवरून ताब्यात घेतला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणून टिप्पर उभा करण्यात आला व चालकावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. सुरवसे हे करीत आहेत. दरम्यान, वाळू घाटांचे लिलाव झालेले असून, देखील अवैधरित्या वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल प्रशासनाचे मात्र, दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.