बीड : नांदूरफाटा ते नांदूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, किरकोळ डागडुजी केल्याने पुन्हा रस्ता खराब होत आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून, पक्का रस्ता करण्याची मागणी आहे.
टेम्पोची धडक, दीड लाखांचे नुकसान
बीड : औरंगाबादकडे जाणाऱ्या महामार्गावरील पाडळसिंगी पुलापुढे नारळ घेऊन जाणाऱ्या टेम्पोस (एमएच ०८ जेयू ८८९०) समोरून आलेल्या टेम्पो (एमएच १२ एफसी ४८९०) ने जोराची धडक दिली. शेख जावेद शेख रहीम (राजापिंप्री, ता. औरंगाबाद) हे जखमी झाले. त्यांच्या टेम्पोचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. गेवराई पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तागडगाव येथून दुचाकी लंपास
बीड : गेवराई तालुक्यातील तागडगाव येथे सत्यनारायण विठ्ठलराव मोटे यांनी त्यांची दुचाकी (एमएच २३ एएच ३८५१) ही दुकानासमोर उभा केली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना २१ डिसेंबर रोजी घडली. या दुचाकीची किंमत ३० हजार रुपये इतकी होती. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ट्रॅक्टरचालकावर गुन्हा
बीड : अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ५७०९) हा २० डिसेंबर रोजी गेवराई तालुक्यातील नागझरी फाटा येथून ताब्यात घेण्यात आला. यावेळी या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत एक ब्रास वाळू आढळून आली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सोपान मोटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाण
बीड : मावशीला नेहमीच त्रास का देता, अशी कुरापत काढून शिवाजी भुजंग आव्हाड यांना मारहाण करण्यात आली. ही घटना शिरूर तालुक्यातील वडाची वाडी येथे घडली. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात महादेव कचरू गीते, आशाबाई आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
बीड : शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असतात. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. दरम्यान, या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचे प्रकारदेखील वाढत आहेत. यामुळे पथदिवे रात्रीच्या वेळी कायम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
दुभाजक दुरूस्त करा
बीड : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापर्यंत सिमेंट रस्ता करणे सुरू आहे. दरम्यान, दुभाजकामध्ये दुरुस्ती न केल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी अशोक सुखवसे यांनी केली आहे.
पाणंद रस्ते करावेत
बीड : ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाणारे हे रस्ते अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेले नाहीत. सत्ताधारी पक्षाने लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याची मागणी शिवसंग्रामचे तालुका प्रमुख सचिन कोटूळे यांनी केली आहे.
जाब विचारल्याने वाद
बीड : माझ्या भावास तुला बोलण्याचे काय कारण आहे, असा जाब विचारला म्हणून सोनाली कचरू गीते (श्रीपतवाडी, ता. शिरूर) यांना मारहाण करण्यात आली. चकलांबा पोलीस ठाण्यात शिवाजी भुजंग आव्हाड, लक्ष्मण बाबू आव्हाड, गोकूळ आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फवारणीस सुरुवात
बीड : रबी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मधल्या काळात ढगाळ वातावरण असल्याने तो अधिक वाढला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी फवारणीच्या कामास लागले असून, त्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.
अनधिकृत बॅनरमुळे रस्ता दिसेना
बीड : शहरातील विविध भागात अनधिकृतरित्या लावलेल्या होर्डिंग्समुळे विद्रुपीकरण होत आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध लावलेल्या बॅनरमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे अपघातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत बॅनर हटविण्याची मागणी होत आहे.
बाजारतळाची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाजारतळाची दुरुस्ती करण्याची मागणी वेळोवेळी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
बीड : शहरातील विविध भागांत गटारी तुंबलेल्या असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे धूरफवारणी व गटारींची स्वच्छता करावी. जेणेकरून डासांची उत्पत्ती कमी होईल. विविध रोगांची लागण होणार नाही, अशी मागणी गणेश वाईकर यांनी केली आहे.
वृक्षतोड थांबविण्याचे वनविभागापुढे आव्हान
बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणी सॉ मिल चालकांकडून वृक्षतोड केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी वनविभागाचे फिरते पथक कार्यरत आहे. मात्र, पथकास न जुमानता सर्रास वृक्षतोड सुरूच आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देऊन निसर्गसंवर्धनासाठी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी वृक्षप्रेमी संभाजी सुर्वे यांनी केली आहे.
जनावरांचा वावर वाढला
बीड : बीडसह जिल्ह्यातील इतर शहरांत मुख्य रस्त्यांवर गाय, म्हैस, गाढव या प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रात्रीच्या वेळी जनावर न दिल्यास अपघात होतात. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
अपघातप्रकरणी गुन्हा
बीड : तालुक्यातील मोरगाव फाट्याजवळ भरधाव दुचाकी (क्र.एमएच २३ बीए ३६६८) ने समोरून येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच १६ एएच ५४३४) ला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक महिला जखमी झाली. १९ डिसेंबर रोजीच्या अपघातप्रकरणी २१ डिसेंबर रोजी नेकनूर ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.