बीड : परळी येथे धनंजय मुंडे पती असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या चालत्या गाडीची डिक्की उघडल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. याच व्यक्तीने शर्मा यांच्या वाहनात पिस्तूल ठेवल्याची चर्चा होती. त्यानंतर बीड पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू असल्याचे सांगितले होते; परंतु १० दिवस उलटूनही ती व्यक्ती अद्यापही बीड पोलिसांना सापडलेली नाही. तपास संथ आहे की मुद्दाम दुर्लक्ष केले जाते? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
गुन्हे उघड करण्यात बीड पाेलीस कायमच अव्वल असतात, तसेच मध्यंतरी ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांच्याही मुसक्या बीड पोलिसांनी आवळल्या होत्या. कोणत्याही गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या बीड पोलिसांना करुणा शर्मा यांच्या गाडीची डिक्की उघडणारी तोंड बांधलेली व्यक्ती अद्यापही सापडलेली नाही. व्हिडिओ अस्पष्ट व इतर कारणे सांगून परळी पोलिसांकडून वेळ मारून नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली असून तो व्यक्ती कोण? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
कोट
गाडीची डिक्की उघडतानाचे व्हिडिओ बाजूने आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. समोरच्या बाजूने काही व्हिडिओ मिळतात का, याची चाचपणी सुरू आहे. अद्याप एकालाही संशयित म्हणून चौकशीसाठी बोलावलेले नाही.
आर. राजा, पोलीस अधीक्षक बीड.