धारूर : ऊसतोडणी येत नसल्याने विवाहितेचा सासरी सतत छळ करण्यात आला. अखेर त्या विवाहितेने छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील बोडका येथे उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.
सुरेखा ज्ञानेश्वर उघडे (वय ३३, बोडका, ता.धारूर) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. सुरेखाची आई द्रौपदी संदीपन चोपडे यांच्या फिर्यादीनुसार सुरेखाचे लग्न १६ वर्षांपूर्वी बोडका येथील ज्ञानेश्वर बुजा उघडे याच्यासोबत झाले होते. दोन वर्षांतच तुला ऊस तोडणीचे काम येत नाही असे म्हणत पती ज्ञानेश्वर बुजा उघडे, सासू गंगूबाई, सासरा बुजा राजाराम उघडे आणि दीर रंजित यांनी सुरेखाचा छळ सुरू केला. याबाबत सुरेखाच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा सासरी समजावून सांगितले; परंतु तिचा छळ सुरूच राहिला. अखेर गुरुवारी सायंकाळी सुरेखाने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे उघडकीस येताच तिच्या कुटुंबीयांनी पळ काढला. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर सुरेखाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.