लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांचे थकीत वेतन अदा करावे अन्यथा ८ एप्रिल २०२१पासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ शहाणे यांनी सांगितले की, यापूर्वी नगर परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत होते. परंतु, गेली पाच वर्ष नगर परिषद प्रशासन कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर करत नाही. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी बरेचदा याविषयी चर्चा केली. वेतनाचा तिढा सोडवून नियमित प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, अशी विनंती केली परंतु, तसे होत नाही. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली असून, औषधोपचारांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१चे वेतन ८ एप्रिलपूर्वी करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची डी. ए.ची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जी. पी. एल.ची रक्कम त्वरित देण्यात यावी, आदी मागण्यांबाबत उपोषणाची नोटीस नगर परिषदेला दिली आहे.
या निवेदनावर जगन्नाथ शहाणे, बाळासाहेब देशमुख, नारायण भोसले, सय्यद ताहेर स. नबी, उत्तम सावजी, शिवाजी ताटे, वै. सु. माने, सनाउल्लाह खान, रहीमखाॅं सरदारखाॅं, धोंडीराम केदारे, संभाजी हजारे, वैजनाथ गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.