अंबाजोगाई :
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयामधील पूर्वीची कॉम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी सिस्टिम बंद पडल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून एक्स-रे काढणे बंद झाले आहे. त्यामुळे एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे त्यांची मोठी गैरसोय होते आहे. एकूणच रुग्णांचे हाल सुरू आहेत. तात्काळ नव्याने मशीन आणून रुग्णांची गैरसोय दूर करावी यासाठी रुग्णांनी व नागरिकांनी मागणी लावून धरली आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात. दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण याठिकाणी तपासले जातात. त्याचप्रमाणे अनेक रुग्णांना ॲडमिट केले जाते. पैकी अंदाजे पाचशे रुग्णांचे एक्स-रे काढले जातात. रुग्णालयामध्ये एकूण आठ एक्स-रे मशिन्स आहेत. त्याचप्रमाणे सीटीस्कॅनचीही सुविधा उपलब्ध आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जुनी असलेली व कालबाह्य झालेली कॉम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी सिस्टिम कायमची बंद पडली. बंद पडल्यानंतर ताबडतोब नवीन मशीनसाठी प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते; परंतु प्रभारी असलेले अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे हे रजेवर असल्याकारणाने प्रस्ताव पाठवण्यासाठी तब्बल तेरा दिवस लागले. डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे दोन ठिकाणचा पदभार असल्याने येथील स्वाराती रुग्णालयाच्या विविध समस्यांकडे व अडीअडचणी सोडविण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याठिकाणी कायमस्वरूपी अधिष्ठाता पद भरणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय उद्भवणाऱ्या अनेक समस्या निकाली निघणार नाहीत, असे चित्र आहे.
वैद्यकीय संचालकांकडे प्रस्ताव पाठवला
तीन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे नवीन डिजिटल रेडिओग्राफी पॅनल खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती दुसरे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. एस. धपाटे यांनी दिली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यासाठीचा पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले. एक्स-रेअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहून आमदार नमिता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी लातूर येथून डिजिटल रेडिओग्राफी पॅनल आणून रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.