संजय खाकरे
परळी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या परळी पंचायत समितीच्या सदस्यांची कामे होत नसल्याने व सदस्यांना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या परळी पंचायत समिती सभापती उर्मिला गीते यांच्या विरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सदस्यांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव पारित केला आहे. या घडामोडीमुळे परळी मतदारसंघात वातावरण चांगले तापले आहे.
ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणूका तोंडावर आल्याने सभापती पदाच्या अविश्वास ठरावाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून परळीकडे पाहिले जाते. परळीत पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून परळी पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व राहिलेले होते. या भाजपच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच पावणे चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत प्राप्त करून दिले. धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून व तन मन धनाने मेहनत घेऊन राष्ट्रवादीच्या सदस्यांना निवडून आणले व पंचायत समितीवर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावला. पहिली अडीच वर्षे नागापूर गणातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना मोहन सोळुंके यांना पंचायत समिती सभापती पदाची संधी दिली. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ लोटल्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी जनक्रांती संघटनेचे संस्थापक बबन गिते यांच्या पत्नी उर्मिला गिते यांची निवड करण्यात आली .
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. पण डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २० असे एक वर्ष सभापती पदाच्या दरम्यान पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात न घेणे व त्यांच्या गणात कामाला प्राधान्य न देणे, अशा सदस्यांच्य तक्रारी होत्या. यातून पर्याय म्हणून सभापतिपद बदलण्याचे संकेत देण्यात आले. त्याप्रमाणे सभापतीपदाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव दाखल केला आणि हा ठराव पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी सभापती उर्मिला गीते मात्र गैरहजर होत्या.
अविश्वास ठरावाच्या बाजूने दहा सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहा व पुरस्कृत एक व भाजपाचे तीन जण होते. सामाजिक न्याय मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात वर्चस्व आहे. पंचायत समिती, परळी नगरपरिषद, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती,याठिकाणी राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असून बीड जिल्हा परिषद ही त्यांच्याच ताब्यात आहे. जि.प.अध्यक्ष पद व गटनेते पद ही परळी मतदारसंघात ठेवले आहे.