बीड : बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली. रखडलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गासाठी पन्नास टक्के वाटा राज्याने द्यावयाचा आहे. युती शासनाच्या काळातही काही निधी मिळाला. या अर्थसंकल्पात या रेल्वे प्रकल्पासाठी निधी देण्याचे सांगितले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे.
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास, माजलगाव येथील भगवान पुरुषोत्तम यांच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचा विकास यासह जिल्ह्यातील नारायणगड, गहिनीनाथगड तसेच जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगड या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. रखडलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गासाठी पन्नास टक्के वाटा राज्याने द्यावयाचा आहे. युती शासनाच्या काळातही काही निधी मिळाला. महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी निधी देण्यात हात आखडता घेतला होता. यासंदर्भात लोकमतने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आवाजही उठवला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या अर्थसंकल्पात या रेल्वे प्रकल्पासाठी निधी देण्यासंदर्भात पाठपुरावा केला. जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या रेल्वेमार्गासाठी भरीव निधी देण्याचे अर्थमंत्री अजीत पवार यांनी सभागृहात जाहीर केले.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड आदी तीर्थक्षेत्रांचा दौरा करून त्याठिकाणी भरीव विकास निधीमार्फत विकासकामे हाती घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानादेखील जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी ही तीर्थस्थळे विकसित करण्यासाठी निधी खेचून आणण्यात मुंडे यशस्वी झाले.
अर्थमंत्र्यांचे मानले आभार
बीड जिल्ह्याच्या वाट्याला यंदा विशेष निधी येईल, अशी अपेक्षा होती व त्यानुसार पाठपुरावाही केला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध योजनांसह जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बीड जिल्हावासीयांच्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अजीत पवार यांचे आभार मानले आहेत. माजलगावचे आ. प्रकाश सोळंके, आष्टीचे आ. बाळासाहेब आजबे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
असा आहे वैद्यनाथ मंदिराचा विकास आराखडा
परळी वैजनाथ येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या जवळपास १३४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने मंजुरी दिली असून, याद्वारे ज्योतिर्लिंग परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन बारीमधील प्रतीक्षागृह, धर्मशाळा, सुलभ शौचालय संख्या वाढवणे, मेरू पर्वतावर कॉटेज, उपहारगृह, उद्यान निर्माण करणे, दगडी फरशी बसवणे, सरंक्षण भिंत, वाहनतळ, हरिहर तीर्थाचा विकास, पेव्हर ब्लॉकिंग, आर.ओ. मशीनसह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाढवणे, डोंगरतुकाई परिसरात सभामंडप, धर्मशाळा, उद्यान, वाहनतळ, सिमेंट रस्ता, भुयारी मार्ग तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांकरिता टेहळणी मनोरे, माहिती फलक, प्रतीक्षालय फर्निचर, पालखी मार्गाचा विकास, मंदिर परिसरात भव्य नंदी, त्रिशूल व डमरू यासह डिजिटल लॉकरपासून ते सोलार लाइट उभारणीपर्यंत अशी विविध ७७ प्रकारची विकास व सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
===Photopath===
080321\08bed_14_08032021_14.jpg~080321\08bed_16_08032021_14.jpg
===Caption===
वैद्यनाथ मंदीर~पालकमंत्री धनंजय मुंडे