धारूर : वडवणी तालुक्यात ओव्हरलोडमुळे विजेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तेलगाव १३२ के. व्ही. उपकेंद्रातून वडवणी ३३ के.व्ही. येथे नवीन लिंक लाईनचे काम करण्यात येत आहे. या कामाची बुधवारी आ. प्रकाश सोळंके यांनी पाहणी केली. तातडीने काम पूर्ण करून वडवणी तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.
यासंदर्भात माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून वडवणी तालुक्यात ओव्हरलोडमुळे विजेची समस्या निर्माण होत आहे. सतत वीज गुल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी तर अर्ध्या तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या प्रश्नाची आ. प्रकाश सोळंके यांनी दखल घेऊन, वडवणी तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, तेलगाव येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रातून वडवणी ३३ केव्ही येथे स्वतंत्र लिंक लाईन करून वडवणी तालुक्यात वीज पुरवठा करण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे या लिंक लाईनचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. या लिंक लाईन कामाची बुधवारी दुपारी आ. प्रकाश सोळंके यांनी पाहणी करून, संबंधितांशी चर्चा करून, हे काम जलद गतीने करून, वडवणी तालुक्यातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश यावेळी दिले. या लिंक लाईनमुळे वडवणी, देवडी तसेच कुप्पा, चिंचाळा व चिंचवण खडकी देवळा या वीज उपकेंद्रास फायदा होऊन, वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत होणार आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण होईल. आ. सोळंके यांनी वडवणी तालुक्यातील जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न तत्काळ हाती घेऊन, तो सोडवण्यासाठी तातडीने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. यामुळे वडवणी तालुक्यातील जनता आ. सोळंके यांना धन्यवाद देत आहे. यावेळी आ. सोळंके यांच्यासमवेत जि. प. समाज कल्याण सभापती कल्याण आबूज, जयदत्त नरवडे आदी उपस्थित होते.
300621\3307img-20210630-wa0134.jpg
आ.सोंळके ३३ के व्ही लाईनची पहाणी करताना