बीड : जिल्ह्यात २०२० - २१ हंगामात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली २८ डिसेंबरपासून १७ खरेदी केंद्रांवर तूर या पिकाची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, घाटनांदूर, बर्दापूर, धारुर, शिरुरघाट, कडा, कासारी, शिराळ, मंगरुळ, शिरुर, फुलसांगवी, पारनेर व पाटोदा खरेदी केंद्रांवर तूर या पिकाची नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील नजीकच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे छापील पासबुक (अकाऊंट नंबर व आय. एफ. सी. कोड स्पष्ट दिसावा), ऑनलाईन सातबारा उतारा व तलाठी यांच्या सही शिक्क्यासह पीकपेरा घेऊन आपल्या तूर या पिकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी मिलिंद कापुरे यांनी केले आहे. तूर या पिकासाठी आधारभूत दर ६ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.