गेवराई : येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील नागझरी येथील एका इसमाचे प्राण वाचले. शोधकार्यात थोडा जरी विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता; परंतु पोलिसांची तत्परता कामी आली. याबद्दल नागझरी येथील ग्रामस्थांनी पोलिसांचा सत्कार केला.
शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजेदरम्यान गेवराई पोलीस ठाण्यात नागझरी येथील एक अल्पवयीन मुलगा आला. घरगुती कारणावरून माझे वडील रागाच्या भरात घरातून निघून गेले असून, मी रात्रीचे ९ वाजेपर्यंत आत्महत्या करणार आहे. माझ्या मरणाबाबत मला भावपूर्ण श्रद्धांजली द्या, अशी फोनवर धमकी दिल्याचे या मुलाने सांगताच येथील ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी लगेच नमूद इसमाचे मोबाइल लोकेशन सायबरकडून घेऊन शोध सुरू केला असता तो शेतात असल्याचे कळाले. यावरून प्रभारी पोलीस निरीक्षक काळे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे तो इसम फाशी घेतलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्यास तातडीने खाली उतरविण्यात आले व गेवराई येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चांगली असल्याचे सांगितले व त्यास रुग्णालयातून सुटी दिली. गेवराई पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने एका इसमाचा जीव वाचला म्हणून त्या गावातील नागरिकांनी गेवराई पोलीस ठाण्यात येऊन प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
===Photopath===
030421\sakharam shinde_img-20210403-wa0029_14.jpg