लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पोलिसांना गुन्हे केल्याची खबर का देतो असे म्हणत २८ एप्रिल रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घरासमोरच्या पडवीत झोपलेल्या एकावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आला. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील वाकी येथे घडली.
नवनाथ अभिवचन काळे (वय ६०, रा.वाकी, ता. आष्टी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २८ एप्रिल रोजी माळरानावरील वस्ती असलेल्या घरासमोरच्या पडवीत ते झोपले होते. त्याचे पाहुणे असलेल्या तिघाजणांनी आम्ही गुन्हे केल्याची पोलिसांना खबर का देतोस? असे भांडणाचे कारण काढून नवनाथ यांना मारहाण केली. यावेळी कोयता, कुऱ्हाडीने, दगडाने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेऊन ते घरी परतले होते. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. आष्टी पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी १८ मे रोजी नवनाथ काळे याच्या पत्नी ढकूबाई नवनाथ काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कुलदीप हनुमंत काळे, नटू मिनीनाथ काळे, गोट्या माहाश्या भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
...तर खुनाचा गुन्हा दाखल करणार
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात जर त्या व्यक्तीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले तर, गुन्ह्यातील कलम वाढवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले.