माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रात वाळूचोराचा धुमाकूळ सुरू असताना तीन दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड स्वतः तीन तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन २६ डिसेंबर रोजी कारवाईसाठी गेले. काळेगाव थडी येथे विना क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महसूलच्या पथकाने हा ट्रॅक्टर पकडून संबंधित ट्रॅक्टरच्या चालकावर गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या ट्रॅक्टर चालकाची पोलिसांनी कोरोना चाचणी घेतली. या चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली. मात्र, या वाळूच्या कारवाई दरम्यान आरोपी चालकाच्या संपर्कात उपविभागीय अधिकारी, तीन तलाठ्यांसह अन्य कर्मचारी आले होते. कोविडच्या नियमांतर्गत हे अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन होणे आवश्यक होते. ही बाब माहिती असतानाही संबंधित अधिकारी अद्याप क्वारंटाईन न होता कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब गंभीर आहे. या अधिकाऱ्यांकडून कोविड नियमांची पायमल्ली होत असून, स्वत:बरोबर अन्य अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
माझ्यासह कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या आहेत. आमचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.