बीड : खरीप हंगामातील पिकांवरील संकटाची मालिका ही सुरूच आहे. गतआठवड्यातील दोन दिवसाच्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील काही भागातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाच्या ओढीने अद्यापर्यंत हजारो हेक्टरवरील खरीपाची मोडणी झाली आहे. उर्वरीत पिकेही अंतिम घटका मोजत असताना जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. या भुरभूरीचा फायदा तर सोडाच उलटार्थी किडीचा प्रदुर्भाव झाल्याने पिकांना धोका पोहचत आहे. पिकांची वाढ खुंटलीच आहे शिवाय कीडीमुळे आहे त्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध औषध फवारणीला सुरवात केली आहे. खर्चिक औषधांची फवारणी न करता सेंद्रीय शेती किंवा अर्ध सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले. खरीपातील कापूस, उडीद या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे.औषध फवारणीविषयी कृषि विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)
आता खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: August 18, 2015 00:08 IST