कडा : कोरोनाचे संकट वाढत चालले असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी आठवडी बाजार, यासह विविध प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली असली, तरी स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. तालुक्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून ग्रामीण भागातील डोंगरगण येथे आठवडी बाजार भरला. विशेष म्हणजे ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असल्याने आता वरिष्ठ अधिकारी स्थानिक प्रशासनावर काय कारवाई करणार? अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्य़ात कोरोना रुग्णाचा शंभरच्यापुढे आकडा पार केला असतानाच, शुक्रवारी याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन नियमावली जाहीर करून ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार, यात्रा, आंदोलने यावर प्रतिबंध आणला. हे आदेश शुक्रवारी जिल्हाभरातील अधिकाऱ्यांना दिले; पण आष्टी तालुक्यातील प्रशासन एवढे निगरगट्ट आहे की, ग्रामीण भागात ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग ठेवत मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आठवडी बाजार भरवले गेले. असे असताना याकडे कोणताच अधिकारी फिरकला नाही की गावचे ग्रामसेवक यांनी तशा सूचना केल्या नाहीत. मग जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जर केराची टोपली दाखवली जात असेल, तर यावर ते काय निर्णय घेतील, हे पाहणे गरजेच आहे. तालुक्यातील प्रशासनाने सक्रिय होऊन अशाप्रकाराला आळा घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे.
...म्हणे लोकच ऐकत नाहीत
डोंगरगण येथे रविवारी सकाळी आठवडी बाजार भरला असता, ग्रामविकास अधिकारी एन. एन. लोंढे यांना विचारले असता, मागेच बैठक घेउन बोललो आहे. पण लोकच ऐकत नाहीत, आमचे सांगायचे काम आहे, असे हतबल उत्तर देऊन त्यांनी फोन ठेवला.
===Photopath===
080321\08bed_1_08032021_14.jpg
===Caption===
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलत डोंगरगण येथेही भरला आठवडी बाजार