मधुकर सिरसट/केज(बीड): सोमवारी देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पण दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. देशमुख कुटुंबीय दुःखात असल्यामुळे आपणही रमजान ईद साजरी करणार नाही, असा निर्णय गावातील सर्व मुस्लिम बांधवानी घेतला.
संतोष देशमुख हे प्रत्येक वेळी आमच्या सोबत असायचे, ते आमच्या सुख दुःखात सामील व्हायचे. या वर्षी मंगल कार्यालयात ईद साजरी करण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला होता, परंतु ते स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवानी सोमवारी सकाळी रमजान ईदची नमाज मशिदीत अदा केली आणि त्यानंतर 10 वाजता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधूला. यावेळी त्यांची गळा भेट घेताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले, अनेकांनी मोठं मोठ्याने हंबर्डाही फोडला.
सरपंच या नात्याने संतोष देशमुख प्रत्येक रमजान ईदला मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे, त्यांच्यासोबत अल्पोपहार करायचे. परंतु यंदा सरपंच हयात नसल्याने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रमजानदिनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. धनंजय देशमुख मुस्लिम मोहल्ल्यात गेले, त्यावेळी सर्वांना अश्रू अनावर झाले. पुढची ईद दणक्यात साजरी करू, असे संतोष अण्णा म्हणाले होते, असे सांगताना अनेक मुस्लिम बांधवांचा कंठ दाटला.
कुणाच्याच घरी गोड पदार्थ नाही...2 मार्च पासून पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या दरम्यान मस्साजोग येथील लहानापासून ते वयोवृध्दांनी रोजे पूर्ण केले. मात्र, 200 हून अधिक लोकसंख्या आसलेल्या मुस्लिम बांधवांच्या 20 ते 25 घरात रमजान ईद निमित्त शिरकुंभा किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ बनले नसल्याची माहिती जिशान अलीम सय्यद यांनी लोकमतशी बोलताना दिली.