अंबाजोगाई : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे तापमानात वाढ होत चालली आहे. वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. अशा स्थितीत वाढत्या उन्हात अत्यावश्यक सेवा देणारी पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तासाठी ठाण मांडून आहे. सर्व उपाहार गृह व हॉटेल, टपऱ्या बंद असल्यामुळे कडक उन्हात बंदोबस्त करणाऱ्या पोलीस बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक परिसर, शिवाजी चौक व शहरातील मुख्य परिसरात पाणपोईची नितांत आवश्यकता आहे.
प्रोत्साहन रक्कम कधी होणार जमा
अंबाजोगाई : राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्षे लोटून गेल्यानंतरही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने जमा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.
कैरीच्या दरात वाढ
अंबाजोगाई : उन्हाळा सुरू होताच कैरीचा हंगाम सुरू झाला आहे. मार्च महिन्यापासूनच बाजारपेठेत कैरी यायला सुरुवात झाली होती. मात्र, अचानकच गारपीट झाल्याने कैऱ्या मोठ्या प्रमाणात झडून गेल्या. त्यामुळे आंब्यांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता तुरळक झाडांनाच कैऱ्या आहेत. त्यामुळे कैऱ्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.