परळी ( बीड) : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी परळी दौऱ्यावर होते. परळीचा दौरा आटपून कारने जात असताना दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एक मिनार चौक दरम्यान मुस्लिम समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करीत सोमय्या यांना काळे झेंडे दाखवले.
विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत गुन्हे दाखल करावे यासाठी सोमय्या हे परळी शहर पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे मार्गे ते दुपारी बाराच्या दरम्यान गेवराईकडे जाण्यासाठी वाहनांमध्ये बसले असता छत्रपती शिवाजी चौक मार्गे जात असताना मुस्लिम तरुणांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाड्याजवळ घोषणाबाजी केली.
सोमय्या यांच्यावर कारवाई करावीदरम्यान, सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांच्या आडून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवत असून समाजात द्वेष पसरवत आहेत. जाणूनबुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागण्या मान्य न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाने एका निवेदनाद्वारे तहसलिदारांकडे केली आहे.
बोगस जन्मप्रमाणपत्राची चौकशी करावी - किरीट सोमय्याबीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव, गेवराई व बीड शहर येथे ज्यांच्याकडे जन्माचे कागदपत्र नव्हते, अशा नागरिकांना विलंबित पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विलंबित जन्म प्रमाणपत्र देणे ही चिंतेची बाब आहे. जन्माचे कागदपत्र नसणे खोट्यासह्या, नोटरीचा पत्ता नाही, अशा अपात्र व्यक्तींना मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नायब तहसीलदारांना अधिकार नसतानाही जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे .या बोगस जन्मप्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील मूळ मुसलमान नागरिका विषयी काहीही अडचण नाही ,असे ही सोमय्या म्हणाले.