अंबाजोगाई शहरात अवैध वृक्षतोड
अंबाजोगाई : शहरालगत आद्य कवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ परिसर, या परिसरात वनविभागाची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. हा परिसर वृक्षांनी चांगला बहरलेला असताना वेळीच वनविभागाने या परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवून हा परिसर योग्य स्थितीत ठेवावा, अशी मागणी आहे. परंतु अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष न देता वृक्षतोड सुरूच आहे.
यंदा कडब्याला जनावरे दुरावणार
माजलगाव : तालुक्यात उसाची लागवड व हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक लावल्यानंतर ज्वारी सांभाळणे मोठ्या जिकरीचे काम आहे. तसेच ज्वारीला बाजारात योग्य भावही मिळत नाही. ज्वारीपेक्षा हरभऱ्याचा पेरा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतो. त्यामुळे तालुक्यात ज्वारीचा पेरा अत्यल्प झाला आहे. पेरा कमी झाल्यामुळे जनावरांसाठी लागणारा कडबा यात मोठी तूट निर्माण होईल. यामुळे जनावरे ज्वारीच्या पोषक अशा कडब्याला मुकणार आहेत. परिणामी कडब्याचे भाव गगनाला भिडू शकतात.
तुरीची मोंढ्यात आवक वाढली
अंबाजोगाई : येथील मोंढा बाजारात सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडल्याने तुरीचे उत्पादन बहरले होते. तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव यावर्षी कमी राहिला. परिणामी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले. आता तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. भावही चांगला मिळत असल्याने शेतकरी तूर मोंढ्यात आणत असल्याचे चित्र आहे.